आनंद प्रसारण
सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन सहा दशक अधिक काळ विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करीत आहे. त्यामुळे अखिल विश्र्वामध्ये वैचारिक क्रांती घडवून खऱ्या अर्थाने परिवर्तन शक्य झाले आहे.
यापूर्वी जीवनविद्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करताना ग्रंथदिंडी, पुस्तके , सी डीज, कोर्सेस, प्रवचने, व्याख्याने या माध्यमांचा प्रामुख्याने समावेश केला आहे. परंतु तंत्रज्ञानाचीच कास धरून आता इंटरनेट रेडीओच्या माध्यमातून जीवनविद्या तत्वज्ञान ,मार्गदर्शन पावलोपावली सातत्याने म्हणजेच ३६५ x २४ x ७ दिवस लोकांना मिळेल. याकरिता 'आनंद प्रसारण ' ह्या श्राव्य माध्यमाचे इंटरनेट रेडिओ चॅनेल निर्माण करण्यात आले आहे.
आनंद प्रसारण च्या माध्यमातून मुख्यत्वे विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मार्गदर्शन केले जाईल. बाल संस्कार केंद्रातील मुलांना याच माध्यमातून त्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.राष्ट्राचा पाया अधिक बळकट करण्यासाठी जीवनविद्या मिशनने उचललेले हे क्रांतिकारक पाऊल आहे.आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसयिक जीवनात येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सद्गुरुंचे आणि श्री प्रल्हाद दादांचे मार्गदर्शन ऐकावयास मिळेल.
जीवनविद्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून तसेच ते जीवनात अंगिकारून ज्यांनी स्वतःचे जीवन घडविले अशा यशस्वी लोकांचे अनुभव आपल्याला ऐकता येतील. तत्वचिंतक श्री प्रल्हाद पै कॉन्फरन्स कॉलच्या उपक्रमातून जगभरातील चाहत्यांना वेळोवेळी उत्कृष्ट मार्गदर्शन करीत आहेत. ते देखील ह्या चॅनेल वर प्रसारित करण्यात येईल.
सद्गुरू प्रणित साधनेतून आपली आध्यात्मिक उन्नती साधण्याची अनमोल संधी सर्वसामान्य जनाना उपलब्ध होईल. विविध उपासना, नाम संकीर्तने, तसेच शरीर साधना देखील प्रसारित करण्यात येतील. जीवनविद्या मिशन मधील कार्याच्या अंगाने होणाऱ्या जगभरातील घडामोडी विषयी आपणास वेळोवेळी माहिती दिली जाईल. आनंद प्रसारणाचा एकमेव हेतू आहे की ज्ञानाच्या माध्यमातून आनंद वाटणे. माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे.
चला आनंद वाटू, आनंद लुटू!
आनंद प्रसारण
ज्ञानातून आनंद,
आनंदातून विश्वकल्याण